न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२४) :- महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेसाठी (वायसीएम) लवकरच विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थंडावली होती.
महापालिकेचे संत तुकारामनगर येथे ७५० खाटांचे वायसीएम रुग्णालय आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात हे रुग्णालय आहे. त्यामुळे येथे पिंपरी-चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातुन देखील रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णालयामध्ये सध्या विविध तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाच्या वतीने काही तज्ज्ञ डॉक्टर घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने दोन भूलतज्ज्ञ, दोन क्ष-किरणतज्ज्ञ, दोन आयसीयू सुपरवायझर (इंटेन्सिव्हिस्ट), एक ओरल म्युक्झुला फेशियल सर्जन (दातांचे विशेष तज्ज्ञ डॉक्टर), एक न्यूरोसर्जन यांचा समावेश आहे. त्याबाबत यापूर्वीच संबंधितांकडून अर्ज मागविले होते. विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे ही प्रक्रिया थांबली होती. दरम्यान, आता आचारसंहिता संपल्यामुळे येत्या १५ तारखेपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.
वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेतंर्गत सुरु करण्यात येत असलेल्या परिचारिका महाविद्यालयासाठी देखील प्राचार्य, उपप्राचार्य आणि सहायक प्राध्यापक यांची पदे भरली जाणार आहेत. पुढील दीड महिन्यांच्या कालावधीत ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती डॉ. वाबळे यांनी दिली.











