न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०२४) :- रस्त्यांवर रात्री अपरात्री कचरा टाकणाऱ्या नागरिकांना रंगेहाथपकडून महापालिकेच्या पथकांनी त्यांना तब्बल एकूण ६० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
शहराच्या वाकड, हिंजवडी, देहूरोड, मामुर्डी या उपनगरांच्या सीमेलगत अनेक ठिकाणी रात्री बाहेरील लोक कचरा टाकून निघून जातात. तसेच, विक्रेत्यांकडून कचरा टाकून परिसर अस्वच्छ केला जात आहे. भाजीपाला, खाद्यपदार्थ, फळे-फुले विक्रेते व अन्य पथारी व्यावसायिक रात्री घरी जाताना कचरा, उरलेले अन्नपदार्थ टाकून जातात. या बेशिस्त विक्रेते व नागरिकांवर महापालिकेच्या विशेष पथकांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
शहराबाहेरील हिंजवडी, देहूरोड, मामुर्डी आदी परिसरातून तसेच, विक्रेत्यांमार्फत शहरात कचरा टाकून अस्वच्छता केली जात आहे. रात्रीच्या वेळी परिसर अस्वच्छ करणाऱ्या तसेच, सार्वजनिक आरोग्यासाठी हानीकारक कृत्य करणाऱ्या नागरिक, अस्थापनांवर कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पथकाकडून ही कारवाई केली जात आहे. गेल्या १५ दिवसांत ६० हजारांहून अधिकचा दंड वसुल करण्यात आला आहे, असे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगीतले.











