- हातातील कोयते हवेत नाचवून पिंपरीत टोळक्याचा नंगानाच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ जानेवारी २०२५) :- आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला हफ्ता द्यावा लागेल, असे म्हणत गॅरेज व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी केली. मात्र, व्यावसायिकांनी खंडणी देण्यास न दिल्याने व्यावसायिक व त्यांच्या दोन कामगारांवर सहा जणांच्या टोळक्याने कायत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री नऊच्या सुमारास पिंपरीत एका हॉटेलजवळ घडली.
याप्रकरणी आरोपी आशिष पाल ऊर्फ कोयत्या व त्याच्या सहा साथीदारांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही. याबाबत अनिल मधुकर बैतुले (वय ४९, रा. पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांचा गॅरेजचा व्यवसाय असून घटनेच्या दिवशी व वेळी आरोपींनी फिर्यादीकडे हफ्त्याची मागणी केली. मात्र, फिर्यादीने हफ्ता देण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीच्या मानेवर कोयता उगारला असता, फिर्यादीने खाली बसून वार चुकविला. त्या कारणाने चिडलेल्या आरोपींनी गॅरेजमधील कामगार मोहम्मद जगीर मन्सुरी (वय २३, रा. भारतमाता चौक, काळेवाडी) व श्रीराम गोवर्धन गौतम (वय २२, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी) यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले. तसेच कामावर आलेल्या गाड्यांवर कोयत्याने मारुन नुकसान केले. दुकानामध्ये दगड मारुन दुकानातील साहित्याचे नुकसान केले.
त्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातातील कोयते हवेत नाचवून आम्ही इथले भाई आहोत, आम्हाला हप्ता द्यावाच लागेल, नाहीतर दुकाने बंद करावी लागतील, कोण आमच्या समोर येतो, त्याला दाखवतो आम्ही कोण आहोत ते, असे मोठमोठ्याने आरडून परिसरात दहशत निर्माण केली.













