न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०१९) :- संजय दत्तच्या एका चित्रपटातील ‘अरे पकडने की बात छोड, आपुन को कोई टच भी नहीं कर सकता’ या संवादाचा चार तरुणांनी हातात कोयते घेऊन व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला होता. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्यांचा शोध घेत दोघांना तात्काळ अटक केली आहे.
अभिजित संभाजी सातकर (वय २२), शंकर संजय बिराजदार (वय १९, रा. पिंपळे निलख), जीवन रानावडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
पिंपळे निलख मधील कबुतराची ढाबळ येथे ४ मे रोजी हा व्हिडिओ तयार केला. या व्हिडीओत चौघांनीही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात कोयता बाळगला आहे. हा व्हिडिओ त्यांनी टिकटॉकवर अपलोड केला. हा व्हिडिओ सांगवी पोलिसांच्या हाती लागला होता.















