- दिव्यांगांसाठी चिंचवडमध्ये शुक्रवारपासून तीन दिवसीय उत्सव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२५) :- दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनच्या वतीने पर्पल जल्लोष –दिव्यांगांचा महाउत्सव साजरा करण्यात येणार आहे.
हा तीन दिवसीय महोत्सव चिंचवड येथील ऑटो क्लस्टर प्रदर्शनी केंद्र येथे १७ , १८, १९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. भारतातील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणारा हा दिव्यांगांसाठीचा पहिलाच भव्य उत्सव असून दिव्यांगांच्या कल्याणासाठी उचललेले एक अग्रगण्य पाऊल असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले. सिनेअभिनेते अमीर खान यांच्याकडून पर्पल जल्लोष कार्यक्रमासाठी शुभेच्छा देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, उप आयुक्त तानाजी नरळे, उप आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्ता भोसले आदी उपस्थित होते.
या उत्सवामध्ये दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या ४० पेक्षा जास्त स्टार्टअप्स, विविध कार्पोरेट कंपन्या आणि विविध संस्था सहभागी होणार आहेत. याठिकाणी दिव्यांगांबाबतच्या सेवांची माहिती देणारे स्टॉल्स उभारणार असून प्रदर्शने देखील भरवली जाणार आहेत. सहभागी कंपन्याकडून दिव्यांगांसाठीच्या नवीन कल्पना, तंत्रज्ञान प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. याशिवाय केंद्र सरकार, राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि दिव्यांग भवन
फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तींसह इतर नागरिकांना व्हावी यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. शिवाय दिव्यांगांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात येणार असून त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची नोंदणी केली जाणार आहे. दिव्यांग नृत्य, गायन, अभिनय, गझल, कविता साहित्य संमेलन, अभिनय,फॅशन शो यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. तसेच दिव्यांगांच्या जीवनावर आधारित लेखन, साहित्य त्यांच्या प्रेरणादायी कथा आणि प्रवासाचा उलगडा करणारे विशेष सत्र देखील याठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमच्या ठिकाणी दिव्यांगांच्या स्थानिक संस्थाकडून खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात येणार असून ते स्टॉल्स दिव्यांग व्यक्ती चालवणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून चौपाटीवर काम करणाऱ्या सर्व दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळेल, तसेच ग्राहकांना रुचकर व स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.












