न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 16 जानेवारी 2025) :- रुपीनगर, तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील बांधकामावर बुधवारी (दि. १५) महापालिकेच्या बांधकाम विभागाने धडक कारवाई केली.
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील रुपीनगर येथे अनधिकृत बांधकाम केले जात होते. बाब निदर्शनास आल्यानंतर संबंधित मालकांना आधी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरीही बांधकाम सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली.
यावेळी रुपीनगर परिसरातील चार अनधिकृत बांधकामांवर ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयीन प्रमुख श्रीकांत कोळप यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. स्थापत्य विभागाचे सहायक अभियंता विकास वारभुवन, निकिता भोईटे, रुपक शिंगारे, आकाश लोखंडे, कर्मचारी योगेश मुंगसे, तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५ जवान, चिखली पोलिस कर्मचारी, ब्रेकर, दोन जेसीबी, तांत्रिक कर्मचारी आदींच्या सहकार्याने सदर कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून महापालिकेने वाकडमधील दत्तमंदिर परिसरात अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर कारवाई केली होती. यात अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.