न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 16 जानेवारी 2025) :- पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक (प्रशासन आणि जनसंपर्क) हेमंत सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुण्यातील मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार आहे. आधी पुण्यातील मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत चालवली जात होती.
मात्र आता हा कालावधी एक तासाने वाढवण्यात आला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मेट्रोची वेळ एक तासाने वाढवण्यात आली असल्याचे महा मेट्रोच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सुरु असायची. परंतु आता ही सेवा रात्री 11 पर्यंत सुरु राहणार आहे.
यामुळे आता मेट्रो गाड्यांमधील मध्यांतर एक मिनिटाने कमी होईल. म्हणजे आता सात मिनिटांऐवजी मेट्रो गाड्या सहा मिनिटांच्या अंतराने धावतील. यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असल्याने नागरिकांच्या माध्यमातून मेट्रो प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.