न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२५) :- हिंजवडी परिसरातील नागरिकांना आणखी तातडीने मदत मिळावी, यासाठी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फेज दोन येथे पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते झाले.
हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्या, रहिवासी सोसायट्या येथील कामगार, महिला व मुले यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना तत्काळ पोलिस मदत मिळावी, यासाठी अॅम्बेसी टेक-झोन या कंपनीच्या सहकार्याने या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. याठिकाणी पोलिस कर्मचारी हजर असणार असून, फेज-२ भागात पोलिसांची सतत गस्त राहणार आहे. त्यामुळे कर्मचारी व परिसरातील नागरिकांना त्यांच्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी मदत होणार आहे.
या मदत केंद्राच्या उद्घाटनावेळी पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, अॅम्बेसी टेक-झोन कंपनीचे पदाधिकारी तसेच परिसरातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी नागरिक उपस्थित होते.











