- वराळेत स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर गोळीबार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२५) :- दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. चाकण एमआयडीसी परिसरातील वराळे येथे येथे सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात खळबळ उडाली होती.
प्राथमिक माहितीनुसार, कंपनीचे व्यवस्थापक अजय सिंग (रा. हिंजवडी) हे सोमवारी सकाळी कंपनीत आले. त्यांच्या मागोमाग एका दुचाकीवरून दोन जण आले. दोघांनी हेल्मेट घातलेले होते. त्यांनी अजय सिंग यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात एक गोळी अजय सिंग यांच्या पोटाला लागली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळीबार झाल्याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, गोळीबार करणारे दोघे अज्ञात दुचाकीवरून वराळे ते भांबोलीच्या दिशने पळून गेले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे शहर व पुणे ग्रामिण पोलिसांना देखील याबाबत माहिती दिली.















