न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जानेवारी २०२५) :- भोंडवे वस्ती, रावेत येथे क्रिकेट मैदानासाठी दिलेली जागा लेबर कॅम्पसाठी द्यावी, म्हणून दमदाटी करत सात जणांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना १७ ते १८ जानेवारी रोजी घडली.
संतोष कोंडीबा भोंडवे (४१, रा. रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन दत्तात्रय भोंडवे, ऋषिकेश बाळकृष्ण भोंडवे आणि इतर पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी संतोष भोंडवे यांची ८५ गुंठे आणि बाळकृष्ण महादेव भोंडवे यांची ७८ गुंठे जागा एका व्यक्तीला क्रिकेट मैदानासाठी भाड्याने दिली आहे. ती जागा लेबर कॅम्पसाठी द्यावी, अशी आरोपींची मागणी होती. त्यावरून आरोपींनी संतोष भोंडवे यांना त्यांच्या घरात घुसून मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी संतोष भोंडवे यांचे कुटुंबीय आले असता त्यांना देखील आरोपींनी धक्काबुक्की करून मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.











