- विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22 जानेवारी 2025) :- अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तसेच शुल्क घेऊनही परवाना वाटप झाला नाही. फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई सुरू आहे. यासह अनेक मागण्यांसाठी शहरातील फेरीवाल्यांचा मोर्चा गुरुवारी (दि. २३) पिंपरी चिंचवड महापालिकेवर धडकणार आहे.
टपरी, पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने फेरीवाला समितीच्या सदस्या आशा बाबा कांबळे यांच्या नेतृत्वात दुपारी दोन वाजता हे आंदोलन होणार आहे.
याबाबत पंचायत चे वरिष्ठ उपाध्यक्ष दामोदर मांजरे व कार्याध्यक्ष बळीराम काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील वीस हजार टपरी, पथारी, हातगाडीधारकांचा सर्वे करण्यात आला आहे. यापैकी सोळा हजार लाभार्थ्यांना पात्र करण्यात आले असून त्यांना लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू आहे. लायसन्स देण्यासाठी मनपाच्या वतीने एक हजार चारशे रुपये घेतले जात आहेत. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र अमानुषपणे अतिक्रमण कारवाई करून गोरगरीब मागासवर्गीय जनतेचा माल जप्त करून अन्याय अत्याचार केले जात आहेत. ई क्षेत्रीय कार्यालय, क क्षत्रिय कार्यालय, ग क्षेत्रीय कार्यालय सह शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयामध्ये अशा प्रकारे अमानुषपणे अतिक्रमण कारवाई सुरु आहे.
याबाबात संघटनेच्या वतीने मागील आठवड्यामध्ये महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले होते. परंतु कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे महापालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने सुरू केलेली अतिक्रमण कारवाई थांबवावी. फेरीवाल्यांना लायसन्स वाटप प्रक्रिया सुरु करावी. फेरीवाल्यांचे पक्क्या गाळ्यामध्ये पुनर्वसन करण्यात यावे हा मोर्चा काढण्यात येणार आहे.











