- पिं. चिं. पोलीस आयुक्तालय आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उद्योजकांना करणार मार्गदर्शन..
- चाकण MIDC उद्योजक संघटनेचा पुढाकार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. 23 जानेवारी 2025) :- वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. 25) रोजी MIDC फेज 3 येथील सह्याद्री इंडस्ट्रीज येथे दुपारी तीन वाजता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्योजकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
चाकण MIDC आणि लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले आहे. त्यामुळे देशासह इतर आंतरराष्ट्रीय समूहाच्या विविध कंपन्यांनी इथे आपलं बस्तान बसवलेलं आहे. परिसराचाही मोठा विकास झाला असल्यामुळे गुन्हेगारी देखील इथे प्रचंड प्रमाणात फोफावलेली आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच रोखण्यात यावे, अशी चाकण MIDC उद्योजक संघटनेची आग्रही मागणी आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालय आणि महाळुंगे पोलीस ठाणे यांच्या माध्यमातून औद्योगिक परिसरातील वाढती गुन्हेगारी कशी रोखायची? यावर पोलीस अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच उद्योजकांच्या विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना यावर देखील चर्चासत्रात सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यास चाकण MIDC परिसरातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी केले आहे.












