- आयटीआयमधील विद्यार्थ्यांच्या कुशलतेमध्ये वाढ होण्यास मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील युवा वर्गास रोजगारासाठी सक्षम करणे तसेच त्यांना रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने एस. के. एफ. इंडियाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महत्वाचे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या भविष्य केंद्रित उपक्रमांमुळे तसेच व्यापक प्रशिक्षण रचनेमुळे युवांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहरातील तरुणांना कौशल्य विकासाचे तसेच ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्यासाठी एस. के. एफ. इंडिया आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. येस हा कार्यक्रम टाटा स्ट्राइव्ह आणि आयटीआय विभाग मोरवाडी यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण उच्च दर्जाचे असणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या सामंजस्य करारावर महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि एसकेएफ इंडियाचे संचालक शैलेश शर्मा यांनी स्वाक्षरी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, प्राचार्य शशिकांत पाटील, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, एसकेएफ इंडियाचे सीएसआर प्रमुख तनुल सिंघल, उपव्यवस्थापक मयुर देशमुख, सुश्री सोफिया क्लिंगेन स्टीर्ना यांच्यासह सल्लागार उपस्थित होते.
येस कार्यक्रमात विकसित होत असलेल्या ऑटोमोटिव्ह उद्योगाशी संबंधित अत्याधुनिक कौशल्यांसह तरुणांना सक्षम करण्यासाठी विशेष इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) प्रशिक्षणासह ऑटोमोटिव्ह कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रम दिले जाणार आहेत, तसेच आयटीआय मधील विद्यार्थ्यांचे कुशलतेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. रोजगारक्षमता वाढविण्यासाठी लॉजिस्टिक्स कौशल्यांसाठी एक उत्कृष्टता केंद्र तयार करण्याचा देखील महापालिकेचा मानस असल्याचे आयुक्त सिंह यांनी सागितले.












