न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी (दि. २८) रोजी राज्यातील पहिला तृतीय पंथीय सामुदायिक विवाह सोहळा पार पडत आहे. हा सोहळा ‘नारी द वुमन’ संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख, उपाध्यक्षा अर्चना मेंगडे, भाई विशाल जाधव व पवना समाचारचे संपादक अरुण (नाना) कांबळे यांच्या प्रयत्नातून पार पडत आहे.
तृतीयपंथीय पाच जोडप्यांचा सामुदायिक विवाह, सायंकाळी सात वाजता बालाजी लॉन्स काळेवाडी येथे संपन्न होत आहे. या उपक्रमास अनेकांचे मौलिक सहकार्य लाभले आहे. सकाळी अकरा वाजता साखरपुडा समारंभ तर, दुपारी दोन वाजता हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत या वधू-वरांवर अक्षता पडणार आहेत.
या सोहळ्यास खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्याचे एडीजीपी कृष्ण प्रकाश, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, आ. शंकर जगताप, आ. महेश लांडगे, आ. अण्णा बनसोडे, आ. उमा खापरे, आ. अमित गोरखे, उद्योजक संतोष बारणे, अल्केश त्रिपाठी, माजी नगरसदस्य सुप्रिया चांदगुडे, मल्लीशेठ कदरापूरकर आदी उपस्थित राहणार आहेत.











