- चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांची मागणी..
- महाळुंगे पोलीसांनी चाकण MIDC तील उद्योजकांशी साधला संवाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. 28 जानेवारी 2025) :- चाकण MIDC मध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या पुढाकाराने व महाळुंगे पोलीस स्टेशनच्या वतीने नवीन फौजदारी कायदेविषयक कार्यशाळा निघोजे येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी पोलीसांनी उद्योजकांबरोबर संवाद साधला.
महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी कार्यशाळेत उद्योजकांना मार्गदर्शन केले. यावेळी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे आणि संघटनेचे शेकडो सभासद उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी कार्यशाळेत उद्योजकांना नवीन कायद्याबाबत माहिती दिली. वाढत्या गुन्हेगारी संदर्भात उद्योजकांनी डायल 112 वर आपली तक्रार सादर करावी. कंपनी आवारात तसेच बाहेरील रस्त्यालगत चांगल्या दर्जाचे CCTV कॅमेरे बसवावेत. कंपनीतील कामगारांच्या मोटरसायकली व चारचाकी वाहनं कंपनीच्या आत पार्क करावीत. बाहेरील बाजूस पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱे बसवावेत. तिथे सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. औद्योगिक परिसरात उद्योजकांना त्रास, खंडणी मागण्याचा प्रकार होत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कुठल्याही प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने पुढे आले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी औद्योगिक परिसरात पोलीसांची गस्त वाढावी. गुन्हेगारांची पाळेमुळे उखडुन काढावीत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर परिसरात आणखी पोलीस ठाण्यांची निर्मिती करावी. कंपनी व्यवस्थापन पोलिसांना नेहमीच सहकार्य करीत असते. परिसरातील वाहतुक कोंडी हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी वाहतूक पोलीसांची कुमक वाढावी, अशी मागणी यावेळी उपस्थित केली.











