- नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणारी करसंकलन विभागाची अभिनव स्पर्धा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत सध्या मालमत्ताकर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू असून थकबाकीदारांच्या थकीत रकमेवर प्रतिमहिना २ टक्क्यांचा विलंब दंडही वाढत आहे. त्याबरोबरच ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या पाणीपट्टीचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्तांचे नळकनेक्शन खंडित करण्याची कारवाईही सुरू आहे.
यामुळे करसंकलन विभागाकडून नागरिकांनी कर भरण्यासाठी रील, गाणे व रॅपच्या माध्यमातून आवाहन करावे. यासाठी ‘मी जबाबदार करदाता’ रील-रॅप-गाणे बनवा, स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मालमत्ताकर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी करसंकलन विभागाने लाखोंचे बक्षीस जाहीर केले आहे. जे रीलस्टार, संगीतकार, रॅपर असतील, अशांनी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या कलेच्या माध्यमातून नागरिकांना मालमत्ताकर भरण्याचे आवाहन करावे, असे कर आकारणी व कर संकलन विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
करसंकलन विभाग विविध माध्यमातून मालमत्ताधारकांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी पुढाकार घेतो आहे. आम्ही नागरिकांना मालमत्ताकराबाबत माहिती मिळण्यासाठी व त्यांना आवाहन करण्यासाठी एसएमएस पाठवित असून सोशल मीडिया व आदी बाबींचीही मदत घेतो आहोत. करसंकलन विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील जागरूक मालमत्ताधारकांनी सदैव जागरूकपणे कराचा भरणा केला आहे. त्यामुळे चालू वर्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून करसंकलन विभागाची सुरू असलेली मालमत्ताकराबाबत थकबाकी वसुली मोहीम व मालमत्ता जप्ती मोहिमेबाबत माहिती मिळावी व नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करावा, यासाठी रील, गाणे व रॅप या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी क्रिएटर्सनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका…











