न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२५) :- सायकलिंगसाठी घराबाहेर पडलेल्या पुनावळे येथील बांधकाम ठेकेदाराचा मृतदेह १२ तासांनंतर महामार्गावर सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. किवळे येथील देहूरोड बाह्यवळण मार्गावर बुधवारी (दि. २९) सकाळी हा मृतदेह आढळून आला. मृत ठेकेदाराचे नाव भानुकुमार सिंग (४२, रा. पुनावळे, मूळ रा. बिहार) आहे.
भानूकुमार सिंग रोज संध्याकाळी सायकलिंगला जात असत. मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते घराबाहेर पडले; मात्र साडेआठ वाजेपर्यंत परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण फोन उचलला गेला नाही.
बुधवारी सकाळी किवळे येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मृतदेहाजवळील मोबाइलच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली. ओळख पटवल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला. तपास देहूरोड पोलिस करत आहेत.











