- महापालिकेकडून दुकानदारांना इतक्या दिवसांचा अल्टीमेटम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 31 जानेवारी 2025) :- पिंपरी -चिंचवड महापालिकेने चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत भंगार दुकानांवर गुरुवारी (दि. ३०) कारवाईला सुरवात केली. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता.
अखेर कारवाईला स्थगिती देत महापालिकेच्या पथकाला आल्या पावली परत जावे लागले होते. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेने या व्यापाऱ्यांना पुढील सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुन्हा कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
याबाबत माहिती देताना ते म्हणाले, कारवाईने बाधित झालेल्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी शुक्रवारी (दि. 31) रोजी आमची बैठक झाली. या बैठकीत अतिक्रमण हटविण्यासाठी सात दिवसांची वाढीव मुदत देण्यात आलेली आहे. या सात दिवसात या दुकान मालकांनी स्वतः अतिक्रमण काढून घ्यावे. तेथील जागा मालकांनी देखील महापालिका प्रशासनाशी सहकार्य करावे. त्या जागेवर महापालिकेची परवानगी घेऊन अधिकृतरित्या मिळकती उभ्या कराव्यात. यास आमची कोणतीही हरकत नाही. परंतु अनधिकृत अतिक्रमणास आमचा विरोध असल्याचे त्यांनी ‘न्यूज पीसीएमसी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.
नेहमीच चिखली परिसरात आगीच्या घटना घडतात. त्यामध्ये अनेक मालमत्ता भस्मसात होतात. तसेच वायू प्रदूषणात देखील भर पडत आहे. त्यामुळे या मिळकतींवर पुढील सात दिवसानंतर आम्ही कारवाई करणार आहोत.
– मनोज लोणकर, उपायुक्त – पिंपरी-चिंचवड मनपा…











