न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे प्रतिनिधी (दि. ३१ जानेवारी २०२५) :- संत तुकाराम महाराज यांची साधनाभूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे दरवर्षीप्रमाणे माघ शुद्ध दशमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव तथा बाळासाहेब काशीद यांनी दिली.
या सोहळ्यासाठी राज्याच्या कोपऱ्यातून भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशमधूनही मोठ्या संख्येने भाविक भंडारा डोंगरावर येतात. देवस्थानच्या वतीने सप्ताहास येणाऱ्या भाविकांची निवास व भोजन व्यवस्था केली जाते. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी दिवसभर महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे.
दररोज पहाटे चार ते सहा काकड आरती, सकाळी सात ते बारा गाथा पारायण व सायंकाळी सहा ते सात हरिपाठ, रात्री आठ ते दहा कीर्तन राक्षी अकरा ते चार जागर असे कार्यक्रम होणार आहेत. रविवारी ता. (ता. २) ते शनिवारी (ता. ८) दरम्यान रात्री आठ वाजता अनुक्रमे यशोधन महाराज साखरे (आळंदी), अॅड. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर), उद्धव महाराज मंडलिक (नेवासा), चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपूर), एकनाथ आबा महाराज वासकर (पंढरपूर), महंत नामदेव शास्त्री सानप (भगवानगड) व ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी) यांची कीर्तन सेवा तर रविवारी (ता. ९) सकाळी १० ते १२ डॉ. सुदाम महाराज पानेगावकर (आळंदी) यांची काल्याचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे २ ते ८ फेब्रुवारी अखेर सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा ‘संततुकोबांची हृदय स्पंदने एक अनुभूती’ हा अभंग चिंतनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे काशीद यांनी सांगितले.
सप्ताहातील माघ शुद्ध दशमीच्या दिवशी शुक्रवारी (ता. ७) रोजी दुपारी बारा ते दीड प्रा. गणेश शिंदे व गायिका सन्मिता थापटे (शिंदे) यांचा संत तुकाराम महाराजांचे जीवनावरील ‘तुका आकाशा एवढा’ हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे. दुपारी दीड ते चार डॉ. भावार्थरामचंद्र देखणे व ३५ सहकारी यांचे बहुरूपी भारुड कलेचे सादरीकरण होणार आहे. तसेच दररोज सकाळी सहा वाजता सर्व रोग निवारणासाठी डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांचा ‘सर्व श्रेष्ठ अभंग उपचार सहयोगाचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री महंत नामदेव शास्त्री सानप यांचे कीर्तन होणार आहे.











