- उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या मनातलं अखेर ओठावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२५) :- माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला भविष्यात आणखी चांगले दिवस येणार असल्याने हिंंजवडी ‘आयटी पार्क’चा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करून या शहराचे नामकरण ‘पिंपरी-चिंचवड-हिंजवडी महापालिका’ असे करावे. त्यामुळे या शहराची ओळख ऑटो मोबाइल उद्योगाबरोबरच ‘आयटी हब’ अशी होईल, असे मत कायनेटीक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार संस्था संलग्न पिंपरी-चिंचवड शहर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या दहा जणांचा ‘पीसीएमसी टॉप टेन’ पुरस्काराने फिरोदिया यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडची ओळख यापूर्वी मोरया गोसावींचे गाव अशी सांगितली जात होती. त्यानंतर टाटा मोटर्स, एमआयडीसी आल्याने उद्योगनगरी अशी ओळख झाली. आता ‘आयटीनगरी’ अशी ओळख व्हावी, यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. या शहराची लोकसंख्या वाढली आहे. जवळच हिंंजवडी ‘आयटी पार्क’ आहे. त्यामुळे महापालिकेत हिंजवडीचा समावेश करावा. त्यामुळे हे शहर केवळ ऑटो मोबाइल उद्योग नाही, तर आयटी हबही आहे, असे नागरिकांना वाटेल.’
‘देशातील सर्वात मोठी एमआयडीसी पिंपरी-चिंचवडमधील आहे. शहरात टाटा मोटर्ससह मोठे उद्योग, कंपन्या आल्याने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका होण्याचा गौरव पिंपरी-चिंचवडला मिळाला. जकातीच्या माध्यमातून मोठे उत्पन्न मिळत होते, असेही ते म्हणाले.











