- श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील मंदिर निर्माणाच्या कार्याला लाखोंची देणगी द्या..
- विदर्भरत्न, हभप संजय महाराज पाचपौर यांच आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
इंदोरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२५) :- आपल्या सर्वांच्याच मागच्या पिढीने जगद्गुरु तुकाराम महाराजांची कर्जे बुडविली असून आता आपण सर्वांनी याची परतफेड म्हणून या मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण होण्यापूर्वी लाखो रुपयांची देणगी या मंदिर निर्माणाच्या कार्याला देऊन उतराई होण्याची नामी संधी आता आली आहे, असे प्रतिपादन विदर्भरत्न, रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपौर यांनी केले.
गेली ७१ वर्षे श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने तुकोबारायांचा जन्मदिन वसंतपंचमी रविवार, दि. २ फेब्रवारी ते द्वादशी रविवार, दि. ९ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित केलेल्या अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगाच्या निमित्ताने रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपौर बोलत होते.
पाचपौर महाराजांनी उपस्थित भाविकांना आवाहन करीत सांगितले की, श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर सुवर्ण तांबूस दगडात भव्य-दिव्य असे मंदिर निर्माणाचे काम सुरु असून जवळपास ७० टक्के काम आजअखेर पूर्णत्वास आले आहे. हे भव्य-दिव्य मंदिर संपूर्ण देशभरातच एक आकर्षण ठरणार आहे. या देशातील प्रत्येक मंदिर हे जगद्गुरु तुकाराम महाराजांशिवाय पूर्ण होवू शकत नाही कारण वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजेच संतश्रेष्ठ तुकोबाराय… आणि कळसा शिवाय कोणतेच मंदिर पूर्ण होवू शकत नाही.
३५० वर्षांपूर्वी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तुकाराम महाराजांकडे सावकारी, महाजनकी होती. पुढे महाराजांच्या वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षांपर्यंत आई-वडील, पहिली पत्नी यांचे दुःखद निधन, थोरल्या बंधूंनी विरक्तीतून घेतलेला संन्यास, सतत तीन ते चार वर्षांचा दुष्काळ अशी अनेक संकटे येवून देखील तुकोबारायांनी प्रपंचात न अडकता त्या काळात सुमारे ४ लाखांची गहाणखते इंद्रायणी मध्ये बुडविली व याच भागातील हजारो लोकांची कर्जे माफ केली व पुढे सर्व सामान्यजनांच्या कल्याणासाठी अभंग गाथेची निर्मिती केली ती याच पवित्र अशा भंडारा डोंगरावर. आपल्या सर्वांच्याच मागच्या पिढीने महाराजांची कर्जे बुडविली असून आता आपण सर्वांनी याची परतफेड या मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण होण्यापूर्वी लाखो रुपयांची देणगी या मंदिर निर्माणाच्या कार्याला देऊन उतराई होण्याची नामी संधी आता आली आहे, असे महाराजांनी नमूद केले.
खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब काळे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करीत मी स्वतः वैयक्तिक आर्थिक देणगी तर देईलच तसेच भंडारा डोंगरा येणार्या भाविकांना सर्व सुख सोयी उपलब्ध होण्यासाठी शासन पातळीवर विशेष प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली.
सकाळी ७ वा. जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपिठाचे प्रमुख ह.भ.प.नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली गाथा पारायणाचा शुभारंभ झाला. या गाथा पारायणासाठी महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथील हजारो भाविक वाचक म्हणून सहभागी झाले आहेत. या पारायण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी खेड तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब काळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, माजी पं.स.सभापती विठ्ठल शिंदे, माजी पं.स.सदस्य शिवाजी वर्पे, खेड तालुका शिवसेना शाखाप्रमुख व राजगुरू सहकारी बँकेचे संचालक रामदास धनवटे, किसनराव कराळे पाटील, रामभाऊ कराळे पाटील, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपाध्यक्ष विजय सदाशिव बोत्रे, उद्योजक गजानन शेलार, ह.भ.प. रविंद्र महाराज ढोरे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवीअप्पा भेगडे व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते. काकडा आरती संपन्न झाल्यानंतर पहाटे ५.३० वाजता माजी आमदार स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांच्या परिवाराच्यावतीने श्री विठ्ठल- रुक्मिणी व जगद्गुरु तुकोबारायांना अभिषेक करून महापूजा करण्यात आली.











