- शक्तीप्रदर्शन सोडा, स्वागताची साधी बॅनरबाजीही दिसली नाही..
- प्रशासक नावाची ‘अॅडजस्टमेंट’ अजून किती दिवस?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 07 फेब्रुवारी 2025) :- पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी भोसरी आणि चिंचवड मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा गुरुवारी दौरा पार पडला.
या दौऱ्या दरम्यान मोशी येथील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या विकास कामांचा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते झाला.
या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन बडे नेते होते. या कार्यक्रमाला एखाद्या उत्सवाचे स्वरूप प्राप्त होईल आणि शहराचे राजकीय वातावरण ढवळुन निघेल, अशी अटकळ राजकीय तज्ञांनी बांधली होती. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक आपले शक्ती प्रदर्शन करतील, अशी शक्यताही होती. परंतु, ही शक्यता पूर्णता: फोल गेली.
दोन्ही पक्षांचे माजी नगरसेवक आणि निवडणूकीसाठी इच्छुक युवा नेत्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन झालेच नाही. अपवाद वगळता स्वागताची कुठेही होर्डिंग, बॅनरबाजी दिसली नाही.
जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटूनही महापालिका निवडणूक न घेण्याची राज्यकर्त्यांची इच्छा असेल तर, दुसरे काय होणार? प्रशासक नावाची ‘अॅडजस्टमेंट’ अजून किती दिवस चालणार आहे.
आता लवकर ना लोकसभा ना विधानसभा निवडणुक. आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक. तिलाही तारीख पे तारीख पडत आहे. थोडक्यात काय? तर, नगरसेवक राज नसल्यामुळे राजकीय क्रयशक्ती अडगळीत पडल्याची सर्वांनाच जाणीव होत आहे. यातून राज्यकर्त्यांनी बोध घ्यावा.