न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२५) :- अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने मोशी येथील आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र येथे दि. 1 आणि 2 मार्च 2025 रोजी देशी गोवंश तसेच अश्व प्रदर्शन आयोजित केले आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून कोसा, काजळी, देवनी, खिल्लार, लाल कंधारी, साहिवाल, लाल सिंधी, गीर, ओंगोले, वेचूर अशा विविध प्रकारातील गोवंशासाठी प्रजातिनिहाय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रदर्शनाच्या निमित्ताने सिने कलावंतांसह खिलार रॅम्प ऑफ देखील आयोजित करण्यात आला आहे. तसेच, पशु प्रेमींसाठी प्रदर्शनस्थळी जनावरांची खरेदी-विक्री बाजार देखील भरविण्यात येणार आहे.
नोंदणी करण्याची अंतिम तारीख ही दि. २३ फेब्रुवारी असून, सहभागी गोवंश प्रदर्शनस्थळी २८ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपस्थिती राहणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी 8862909090 या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे.
प्रदर्शनासाठी नियम व अटी…
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून देशी गोवंश व अश्व प्रदर्शन आयोजित केले आहे. कमीत-कमी एका गटात १० गोवंश असणे आवश्यक आहे. काजळी आणि कोसा गटामध्ये संख्या जास्त आली, तर गट वेगळे केले जातील.पंच गोवंशाची निवड करण्याअगोदर तुम्हाला यापुर्वी मिळालेल्या बक्षिसांचा विचार करणार नाही. निवड पूर्णपणे पंचांच्या निवड प्रक्रियेने होईल. ७५ कि.मी पेक्षा जास्त अंतरावरून येणाऱ्या गोवंश पालकांना काही प्रमाणात वाहतूक भाडे मिळणार आहे. प्रदर्शनामध्ये गैरवर्तन करणाऱ्या पशुपालकास पुढील ३ वर्षांसाठी बंदी राहील, अशी माहिती अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे यांनी दिली.











