- डिसेंबर अखेर रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर बीआरटी प्रकल्प विकसित केले. त्यापैकी काळेवाडी ते देहू-आळंदी बीआरटी रस्त्याचे काम कंपनीच्या जागेचा ताबा न मिळाल्यामुळे रखडले होते. परंतु, आता जागेचा प्रश्न सुटल्यामुळे भूसंपादनासह या मार्गावरील बीआरटी रस्त्याचा रखडलेला भाग विकसित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
हिंजवडी आयटी पार्क येथे कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना जलद गतीने कामाच्या ठिकाणी पोहोचता यावे, यासाठी महापालिकेने काळेवाडी ते देहू आळंदी मार्गावर बीआरटी विकसित केली. परंतु, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर ते आयुक्त बंगला दरम्यान सुमारे १०० मीटर रस्त्याची जागा ताब्यात न मिळाल्यामुळे १४ वर्ष रस्त्याचे काम रखडले होते.
कंपन्यांनी जागेचा ताबा देण्यास नकार दिल्यामुळे महापालिका येथील बीआरटी रस्ता खोळंबला होता. परंतु, पालिकेच्या पाठपुराव्यामुळे मागील वर्षी जागेचा ताबा देण्यास संबंधित कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कंपन्यांना एमआयडीसीने अन्य ठिकाणी जागा दिल्यामुळे त्यांचा स्थलांतराचा विषय मार्गी लागला. कंपन्यांचे स्थलांतर करण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर हा जागेचा ताबा महापालिकेकडे अधिकृतरित्या मिळाला. त्यामुळे महापालिकेने जेसीबीच्या सहाय्याने कंपन्यांचे बांधकाम पाडून तेथील जागा मोकळी केली.
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी बीआरटी रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. कंपन्यांनी सहकार्य केल्यामुळे जागेचा ताबा लवकर मिळाला. त्यामुळे आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पायाभूत आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. डिसेंबर अखेर हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल.
– मा. प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता (१)…











