- उपमुख्यमंत्री अजित पवार याचं आ. अमित गोरखे यांना आश्वासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यभागातील पवना नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू होण्यासाठी निधी अभावी अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र असल्याची बाब आमदार अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीत आणून दिली.
प्रत्येक वर्षी मामुर्डी, किवळे, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, पिंपळे गुरव, दापोडी, सांगवी या भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होत असून पिंपरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, या भागातील नागरिकांचे वर्षानुवर्ष पूरजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर स्थलांतर हे करावेच लागते. त्यामुळे विशेष बाब म्हणून केंद्रासह राज्य शासनाकडून विशेष निधी मिळावा, असे ते म्हणाले.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या एकत्रित सहभागातून हा प्रकल्प सुरू होईल. पवना नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांना दिले.
यावेळी राज्य नगरविकास मंत्री, माधुरी मिसाळ, आ. दिलीप वळसे पाटील, आ. शंकर जगताप, आ. सुनील शेळके, आ. राहुल कुल, आ. शंकर मांडेकर, आ. चेतन तुपे, विभागीय आयुक्त पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदी उपस्थित होते.











