न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२५) :- शहरातील अनधिकृत रेडी मिक्स कॉंक्रिट (आरएमसी) प्लांट्समुळे वाढत्या हवा आणि ध्वनी प्रदूषणाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पर्यावरण विभागाची परवानगी न घेता हे प्लांट सुरू असल्याने श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, चिंचवड मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून चालू असलेल्या या आरएमसी प्लांट्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच परवानगीशिवाय चालणारी सर्व प्लांट्स तात्काळ बंद करण्यात यावीत, अशी मागणी केली होती.
दरम्यान महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे पत्रकार परिषदेत या विषयाकडे लक्ष वेधले असता, त्यांनी अशा प्लांट्सवर ठोस आणि कडक कारवाई करणे अभिप्रेत असताना पीएमआरडीएकडे बोट दाखवले आहे. असे सर्वाधिक प्लांट पीएमआरडीए हद्दीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुनावळे आणि मोरवाडीतील तीन प्लांटवर कारवाई करीत आर्थिक दंड वसूल केला आहे. नियमावली तयार केली असून तिसऱ्या कारवाईत प्लांट बंद करण्याच्या सूचना सबंधित विभागाला दिल्या असल्याचे ते म्हणाले आहेत.











