न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक १२ आणि वाल्हेकरवाडी पेठ क्रमांक ३० आणि ३२ येथील गृहप्रकल्पातील सदनिकांची सोडत बुधवारी (दि. १२) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही सोडत काढण्यात आली. १ हजार ३३७ सदनिकांपैकी १ हजार १५ सदनिकांसाठी निवड यादी जाहीर केली आहे. मागासवर्गीयांसाठी असलेल्या कोट्यामध्ये अर्ज कमी आल्याने ३२२ सदनिका रिक्त राहणार आहेत.
पीएमआरडीएच्या http///www. pmrda.gov.in या संकेतस्थळावर निवड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन सोडत आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच, अर्जदारांच्या लॉगीनवर आणि त्यांना मोबाईलवर वैयक्तिक एसएमएस करुन देखील ही माहिती कळविण्यात आली आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहातील मंत्रिमंडळ परिषद सभागृहात ही सोडत काढण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ तसेच पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला आदी या प्रसंगी उपस्थित होते. स्थानिक पातळीवर सोडतीचा कार्यक्रम आकुर्डीतील पीएमआरडीए इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. त्यासाठी अर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोडतीच्या कार्यक्रमाचे यूट्युबद्वारे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात आले.
पीएमआरडीएच्या पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिकांसाठी ४७ जणांची निवड यादी काढण्यात आली. तर, एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिकांसाठी ४९८ जणांची निवड यादी जाहीर केली आहे. तसेच, पेठ क्रमांक ३० आणि ३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिकांसाठी फक्त १८० अर्ज आल्याने तेवढ्याच जणांची निवड यादी जाहीर केली आहे. येथील एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिकांसाठी २९० जणांची निवड यादी काढण्यात आली आहे. प्रवर्गनिहाय अर्ज कमी आल्याने एकूण १ हजार ३३७ सदनिकांपैकी १०१५ सदनिकांसाठी निवड यादी जाहीर केली आहे. तर, एकूण ५७८ जणांची प्रतीक्षा यादी देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
निवड यादीतील ज्या सदनिकाधारकांना सदनिका नाकारायची असेल त्यासाठी त्यांना २५ तारखेपर्यंत मुदत दिली जाणार आहे. २६ तारखेपासुन सदनिकांसाठी सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम वगळता सदनिकाधारकांकडून अन्य १०० टक्के रक्कम भरुन घेण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. ज्यांना ही रक्कम पुर्ण भरणे शक्य नसेल त्यांना पहिल्या ४५ दिवसांमध्ये २५ टक्के तर, पुढील ६० दिवसांमध्ये उर्वरित ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर लाभार्थी नागरिकांना ताबा पावती दिली जाणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे सहआयुक्त हिम्मत खराडे यांनी दिली.











