- पत्राशेड, गोदामे, भंगार दुकानांना जागा भाड्याने देणारे मालक दुहेरी संकटात?..
- कारवाईच्या खर्चाचा भार आता संबंधित जागा मालकांच्या सातबारा उताऱ्यावर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२५) :- चिखली – कुदळवाडी येथे सलग सातव्या दिवशी १९२ एकर जागेत असलेल्या ६३३ अनधिकृत पत्राशेड बांधकामांवर निष्कासन कारवाई करण्यात आली. याठिकाणी असलेले अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे या कारवाईमध्ये निष्कासित करण्यात आले. दरम्यान अतिक्रमण कारवाईच्या खर्चाची जागेच्या क्षेत्रफळानुसार विभागणी केली जाणार आहे. खर्च, जागेचा सर्व्हे नंबर, मालमत्ता क्रमांकासह महापालिका तहसीलदार किंवा तलाठ्यांना पत्र देणार आहे. त्यानंतर संबंधित जागा मालकांच्या सातबारा उताऱ्यावर बाेजा चढविण्यात येणार आहे. भविष्यात जागा मालकांना काेणताही व्यवहार करण्यापूर्वी हे पैसे महापालिकेकडे जमा केल्याशिवाय व्यवहार करता येणार नाही.
नियोजित विकास आरक्षणे आणि नागरी सुविधा जागेवरील अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त मोहिमेतून चिखली – कुदळवाडी येथे निष्कासनाची कारवाई करण्यात येत आहे. याठिकाणी शुक्रवारी ८३ लाख ९७ हजार २४९ चौरस फूट बांधकाम निष्कासित करण्यात आले. यामध्ये एकूण ६३३ बांधकामाचा समावेश होता.
कुदळवाडी परिसरात पुन्हा अतिक्रमण हाेऊ नये, यासाठी बीट निरीक्षक, क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे पथक नेमले जाणार आहे. हे पथक परिसरात गस्त घालणार आहे. त्यामुळे अतिक्रमण हाेणार नाही. त्यानंतरही अतिक्रमण झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. पाडकामाची कार्यवाही केल्यानंतर जागा मालकांनी पत्राशेडसह त्यांचे सर्व साहित्य दुसरीकडे उचलून घेऊन जावे. साहित्य जागेवर ठेवल्यास आगीची घटना घडू शकते. साहित्य न हटविल्यास जागा मालकांना नाेटीस देण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई हाती घेण्यात आली. या कारवाई वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, राजेश आगळे, सीताराम बहुरे, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, शीतल वाकडे, अमित पंडित, सुचिता पानसरे, किशोर ननवरे, श्रीकांत कोळप, महेश वाघमोडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते. सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे, डॉ. शिवाजी पवार, बापू बांगर, विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निष्कासनाच्या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील ४ कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. तर ४४ पोकलेन, ८ जेसीबी, १ क्रेन आणि ४ कटर यांचा वापर करण्यात आला. ३ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका देखील याठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका आणि पोलीस यंत्रणेसह वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या निळ्या पूररेषेतील बांधकामेही पाडण्यात येणार आहेत. तळवडे, काळेवाडी, थेरगाव, पिंपरी, वाल्हेकरवाडीतही कारवाई केली जाणार आहे. भंगार दुकाने शहराबाहेर काढण्यात येणार आहेत, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.











