न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- पुणे (दि. १७ फेब्रुवारी २०२५) :- रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बावधन येथील ‘बॉम्बे हाय’ या हॉटेलवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. हॉटेलची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हॉटेलमधील बाउन्सरने अडवल्याने याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. १६) पहाटे पावणेतीन वाजता करण्यात आली.
सागर गायकवाड, सुमित चौधरी, प्रतीक कांबळे (वय २९) आणि बाउन्सर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाईमध्ये संगणक संच, म्युझिक सिस्टिम, सोफा सेट, कुशन चेअर, राउंड टेबल, खुर्चा, टेबल, सीसीटीव्ही डीव्हीआर, हुक्का पॉट असे एकूण नऊ लाख ९२ हजार ७०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे
बावधन येथील बॉम्बे हाय हे हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असून त्यामध्ये मद्यविक्री सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांना मिळाली. पोलिस उपायुक्त गायकवाड यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद गज्जेवार यांना हॉटेलमध्ये जाऊन पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार सहायक निरीक्षक गज्जेवार, बावधन पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक तेजस्वी यादव आणि सहा कर्मचारी असे पथक हॉटेलमध्ये पाहणी करण्यासाठी गेले. हॉटेलच्या काउंटरवर हॉटेल का सुरू आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन पाहणी करताना बाउन्सरने हुज्जत घातली.
















