न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करत परराज्यात जाऊन तब्बल १०२ सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. देशाच्या विविध भागांतून, तसेच रशियातूनही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्याची कामगिरी सायबर पोलिसांनी बजावली आहे.
गुजरात, राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन सायबर पोलिसांनी आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे जयपूर येथे सायबर गुन्ह्यातील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या अंगावर गाडी चालण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत आणि जिवावर उदार होऊन स्वामी यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तसेच, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपआयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनीही महत्वाची भूमिका बजावली. याशिवाय वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलिस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलिस उपनिरीक्षक वैभव पाटील, तसेच पोलिस अंमलदार हेमंत खरात, दीपक भोसले, सुभाष पाटील, विशाल निचीट, दीपक माने, खणसे, नितेश विचेवार, अतुल लोखंडे, सौरभ पाटे आणि महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या पथकाने केली.











