- प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्याने आणखी दोघे कार्यमुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२५) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विविथ विभागांत प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर कार्यरत दोन अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले. यापूर्वी दोन अधिकाऱ्यांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा दोन अधिकाऱ्यांना गुरुवारी कार्यमुक्त करण्यात आले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी याबाबतचे आदेश दिले.
विकास परवाना विभागातील सहायक नगररचनाकार अजिंक्य पवार आणि कनिष्ठ आरेखक भीमराव जाधव यांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले. तसेच विकास परवाना विभागातील शाखा अभियंता पदावर कार्यरत असलेल्या विवेक डुब्बेवार तसेच कनिष्ठ रचना सहायक राहुल दिवेकर यांना गुरुवारी कार्यमुक्त करण्यात आले.
डुब्बेवार हे मार्च २०१८ मध्ये पीएमआरडीएमध्ये रुजू झाले होते. मार्च २०२१ मध्ये त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपला. त्यानंतर त्यांनी मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ घेतली. त्यानुसार त्यांच्या प्रतिनियुक्तीच्या मुदतवाढीचा कालावधी संपल्यानंतर २२ मार्च २०२४ रोजी त्यांना पीएमआरडीएमधून कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर त्यांनी तीन महिन्यांनी पुन्हा मुदतवाढ मिळवली. ५ जून २०२४ रोजी त्यांनी प्रतिनियुक्तीला मुदतवाढ मिळवली. त्यानुसार ते २६ जून २०२४ रोजी पुन्हा पीएमआरडीएमध्ये रुजू झाले. दरम्यान, महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी त्यांना गुरुवारी कार्यमुक्त केले डुब्बेवार यांना त्यांची मूळ आस्थापना असलेल्या पुणे महापालिका येथे प्रत्यार्पित केले.
विकास परवाना विभागातील कनिष्ठ रचना सहायक राहुल दिवेकर हे प्रतिनियुक्तीवर १८ नोव्हेंबर २०१७ रोजी पीएमआरडीएमध्ये रुजू झाले होते. त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी २०२० मध्ये संपला. त्यानंतर त्यांनी २१ नोव्हेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ घेतली. त्यानंतर ४ डिसेंबर २०२३ रोजी त्यांना पीएमआरडीएमधून कार्यमुक्त केले होते. मूळ आस्थापना असलेल्या सेवा नगर परिषद संचालनानय नवी मुंबई या आस्थापनेत दिवेकर यांना प्रत्यार्पित केले होते. ७ जून २०२४ ला पुन्हा मुदतवाढ मिळवून ते पीएमआरडीएमध्ये रुजू झाले होते. त्यांनादेखील आयुक्त डॉ. म्हसे यांनी गुरुवारी कार्यमुक्त केले आणि मूळ आस्थापनेवर पाठवले.
प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यानंतरही पीएमआरडीएमध्ये ठाण मांडून बसलेल्या चार अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठविण्यात आल्याने इतर अधिका-यांनी धसका घेतला आहे.











