न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूरोड (दि. २१ फेब्रुवारी २०२५) :- तक्रार मागे घेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार देहूरोडमधील विनायका नागरी सहकारी पतसंस्थेच्या ऑफिसमध्ये घडला.
याप्रकरणी प्रदीप वसंतराव चव्हाण (रा. मुख्य बाजारपेठ, देहूरोड) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरण परशुराम गवळी (वय ३६, रा. पारशी चाळ, देहूरोड), सचिन देशपांडे (वय ४०, रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक केली असून, धनराज शिंदे (वय ५२, रा. देहूरोड बाजार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचे रावेत येथे गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. आरोपींनी हे बांधकाम बंद करण्याच्या उद्देशाने विविध सरकारी कार्यालये आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागात तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी मिटवण्यासाठी आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्याकडे ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.











