- पुण्यात जाण्याची कटकट वाचली; नागरिकांची कामे वेळेत होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२५) :-चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चिंचवड पोस्टाला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उपटपाल कार्यालय पुणे स्टेशन येथील मुख्य कार्यालयाअंतर्गत जोडली होती. त्यामुळे शहरातील ३५ उपटपाल कार्यालयांचा कार्यभार पुणे स्टेशन येथील मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेशित करण्यात येत होता. टपाल कार्यालयासाठी लागणारे पैसे पुणे कार्यालयातून पोहोचवले जात होते. त्यात वेळ जात होता. नागरिकांची सर्व काम होत नव्हती. अधिकार मर्यादित होते.
चिंचवड टपाल कार्यालयाला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रीय डाक कर्मचारी संघटन वर्ग ३ चे महाराष्ट्र व गोवा परिक्षेत्राचे सहाय्यक क्षेत्रीय सचिव काळुराम पारखी यांनी अडीच महिन्यांपूर्वी खा. बारणे यांच्याकडे केली होती.
शहरातील उपटपाल कार्यालयांना मर्यादित अधिकार होते. त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना पुण्यात जावे लागत होते. पैसे, वेळ वाया जात होता. चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश झाल्याने नागरिकांना टपालच्या कोणत्याही कामासाठी पुण्यात जावे लागणार नाही. चिंचवडचे मुख्य कार्यालय झाले आहे. कर्मचारी वाढणार आहेत. नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे. रोख निधीची कामे लवकर पार पाडली जाणार आहेत. विमाधारकांचे दावा प्रकरण, पेन्शन इत्यादीची कामे सुलभ होण्यास मदत होणार आहे. शहरात टपाल कार्यालयाचे मुख्यालय झाले आहे. भविष्यात विभागीय कार्यालय देखील होणार आहे.
– श्रीरंग बारणे, खासदार मावळ…











