- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भाजपकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका मे महिन्यात होण्याची शक्यता कमी आहे. आरपीआयला लोकसभा आणि विधानसभेत महायुतीकडून जागा मिळाल्या नाहीत. परंतु आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये तसेच जिल्हा नियोजन समिती आणि विविध राज्य महामंडळामध्ये आरपीआयला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी (दि.२२) चिंचवड येथील अजंठा नगर एसआरए प्रकल्प टप्पा ३ चे भूमिपूजन आणि बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते.
आठवले यांनी सांगितले की, परभणी मध्ये झालेल्या घटनेत सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून दोन महिने झाले तरी चौकशी सुरू आहे. पोलिसांबद्दल आदर आहे, परंतु अशा घटनांची चौकशी होण्यासाठी एवढा वेळ लागणे योग्य नाही. या विषयात देखील मुख्यमंत्री यांनी लक्ष घालावे.
नागालँड, मणिपूरमध्ये आरपीआयचे आमदार आहेत. तसेच दादरा, नगर, हवेली, दिव, दमन, लक्षद्वीप सह सर्व राज्यात आरपीआय पोहचली आहे. महाविकास आघाडीचे अपयश म्हणजे ईव्हीएमचा दोष नसून महाविकास आघाडीचा दोष आहे. लाडक्या बहिणी आणि विशेषता दलित मतदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस मतदान केले. लाडक्या बहिणींना आता दरमहा २१०० रुपये देण्यात येणार आहेत. पात्र लाडक्या बहिणींना वेळेत पैसे मिळावेत अशी अपेक्षा आहे. त्यांच्यामुळेच राज्यामध्ये महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. महायुती सक्षम असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी पुन्हा पुन्हा जाणे योग्य नव्हे. आरपीआय महायुतीत असताना राज ठाकरे यांना महायुतीत घेऊन फार फायदा होणार नाही. राज ठाकरेंचा महायुतीला उपयोग होणार नाही असेही स्पष्टपणे रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.
फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना महाराष्ट्र सरकार अनुदान देते. तर दुसरीकडे आंतरजातीय विवाह केला म्हणून विक्रम गायकवाड सारख्या युवकाची हत्या होणे योग्य नाही. यातील आरोपी पकडले असून त्यांना फाशी व्हावी अशीही मागणी मी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहे. भारतामध्ये वर्षाला साधारणपणे १८ लाख आंतरजातीय विवाह होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. जाती, धर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
1 Comments
Darcie Hariston
I have learn several just right stuff here. Definitely worth bookmarking for revisiting. I surprise how much effort you set to make this type of magnificent informative website.