- सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमिपूजन..
- अशी आहे गृहप्रकल्पाची रचना तर, विकसकाकडून मिळणार या सुविधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- एसआरए अंतर्गत झोपडपट्टी धारकांना ३०० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी, अशी मागणी सर्वप्रथम मी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे केली होती. आता कुटुंबाचा आकार वाढल्यामुळे एसआरए अंतर्गत विकसित होणाऱ्या प्रकल्पांमध्ये ४५० स्क्वेअर फुटांची सदनिका मिळावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रामदास आठवले यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) चिंचवड येथील अजंठानगर एसआरए प्रकल्प टप्पा ३ चे भूमिपूजन आणि बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, इलाबाई ठोसर, विश्वास गजरमल, अंकुश कानडी, आरपीआय महाराष्ट्र सचिव बाळासाहेब भागवत, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हवळकर, युवक शहर अध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड, कार्याध्यक्ष योगेश भोसले, चिंचवड विभाग अध्यक्ष नितीन परेकर, राजेश बोबडे, सिकंदर सुर्यवंशी, विकास गाडे, मोहन म्हस्के, विकसक राजेश कदम आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदर्शी नेतृत्व आहे. त्यांनी गरीब, शेतकरी, युवा यांच्यावर लक्ष केंद्रित करून यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. ५० लाख ६५ हजार कोटींचा एकूण अर्थसंकल्प आहे. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय विभागासाठी एक लाख ६८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
अशी आहे रचना…
आकुर्डी येथील सर्वे नं. ८८ मधील अजंठानगरमध्ये एकूण घोषित झोपडपट्टी क्षेत्र १,१०,००० चौ.फू. व त्यावर बांधण्यात येणाऱ्या एकूण १४०० सदनिका व ४० दुकानांचा यात समावेश आहे. आर. के डेव्हलपर्सचे राजेश कदम, इंटेरिम स्टुडिओचे वास्तू विशारद शोएब शेख हा प्रकल्प साकारणार आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रस्तावित लाभार्थी ४०० व त्यानंतर १००० असे आहेत. एकूण इमारती १५ मजल्याच्या ६ इमारती आहेत. सदनिका चटई क्षेत्र ३०० चौ. फू. इतके आहे. यात बी.एच.के. सदनिका हॉल, किचन, बेडरूम, टॉयलेट बाथरूम व स्वतंत्र बाल्कनी असणार आहे.
विकसक देणार या सुविधा…
बुद्ध विहार, मंदिर, उद्यान, व्यायामशाळा, लहान मुलांना खेळण्याचे मैदान, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, अंगणवाडी, बहुउद्देशीय सभागृह, वेलफेअर सेंटर, सोसायटी ऑफिस, सोलर सिस्टीम, गरम पाण्यासाठी प्रत्येक सदनिकेमध्ये गिझर, MNGLगॅस पाईप लाईन व शेगडी, प्रत्येक सदनिकेमध्ये वॉशिंग मशीन.











