- टाइम्स स्क्वेअर आणि इंडियन कॉन्सिलेटमध्ये जिजाऊ वंदना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- इंडियन कॉन्सिलेट आणि छत्रपती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३९५ शिवजयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. संगीता तोडमल इंगुळकर आणि निलेश इंगोळकर यांनी न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअर आणि इंडियन कॉन्सिलेट न्यूयॉर्क येथे शिवाजी महाराजांचा पाळणा गायला. तसेच जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी छत्रपती फाऊंडेशनचे संस्थापक उद्योगपती स्वप्नील खेडेकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. हे फाउंडेशन येथे शिवजयंती समारंभाचे आयोजन करत असते. अमेरिकेसारख्या ठिकाणी अनेक शिवप्रेमींना एकत्र करून छत्रपतींचा आणि त्यांच्या कार्याचा गजर साता समुद्रा पार करणे ही एक विशेष गोष्ट आहे.
या कार्यक्रमासाठी भारताची न्यूयॉर्क कॉन्सिलिट येथील राजदूत बिनाय प्रधान यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्र शासन यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा देऊन छत्रपती फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. त्यांचे प्रतिनिधी म्हणून यावेळी जगजित निंबाळकर आणि वरद ओझरकर उपस्थित होते.
अपार दळवी यांनी छत्रपती फाउंडेशन करत असलेल्या कार्याबद्दलची प्रस्तावना दिली. तसेच न्यूयॉर्क शहरातील एखाद्या रस्त्याला शिवछत्रपतींचे नाव देण्यात यावे. तसेच अमेरिकेतील शिकागो अटलांटा सेंट फ्रान्सिस अशा अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यास कॉन्सिलेटने परवानगी द्यावी, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिका पाटील यांनी केले तर, बिजनेस समेटमध्ये ईशा धुमाळ यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. या बिजनेस समेटमध्ये विनोद झेंडे, विजय सूर्यवंशी दिलीप चव्हाण आदी सहभागी झाले होते. यावेळी रुद्र डान्स अकॅडमी च्या कलाकारांनी डान्स केला तसेच विठ्ठल विठ्ठल या गाण्यावर न्यू जर्सी येथील सपना परिख, मिनल सप्रे, नियति अग्रवाल, चेतना तलवारे, शितल चौरीकर, नेहा ईटाई, शहेला गोस्वामी, साईली जगधने-घावटे या महिलांनी लेझीम डान्स केला.
ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अभिषेक सूर्यवंशी यांनी एन एस ओ कंपनीतर्फे पोर्टल तयार केले असून जगातल्या तीनशे भाषेमध्ये शिवरायांच्या बद्दलची माहिती जगभर पोहोचेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी अटलांटाईतून आलेले सनील इंगुळकर आणि नीलिका इंगुळकर चिमुरड्यांनी डान्स केला.
दिलीप चव्हाण डेप्युटी कमिशनर न्यूयॉर्क सिटी, जेनिफर राजकुमार असेंबली वुमन, श्याम कुमार फाउंडर अँड सीईओ आय एन आय सॉफ्टवेअर यांचीही यावेळी भाषणे झाली.


















