न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२५) :- चिखली मोरेवस्ती परिसरातील राजगड पार्क व माऊली हाउसिंग सोसायटी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सार्वजनिक शिवजयंती उत्सव वर्ष २०२५ यंदाचे मंडळाचे सहावे वर्ष होते.
दरम्यान रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याशिवाय शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि ढोल ताशांच्या गजरात पालखीची पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून मिरवणूक काढण्यात आली.
रक्तदान शिबिरासाठी लाइफ केअर ब्लड बँकेने सहकार्य केले तसेच आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर पुजा राजपूत यांनी सहकार्य केले. त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
गड किल्ले सेवा संस्था चिंचवड, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून शिवकालीन शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. या शस्त्र प्रदर्शनाचा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. यामध्ये अनेक परिचित अपरिचित शिवकालीन शस्त्राचा युद्धामध्ये कसा उपयोग केला जायचा यांचे मार्गदर्शन शस्त्र अभ्यासक संतोष चंदने यांनी केले. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.














