- असा संदेश देणारे ‘अभंग’ चे स्नेहसंमेलन जल्लोषात साजरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २५ फेब्रुवारी २०२५) :- विद्यार्थ्यांना नदीचे जीवन समजून यावे, नदीच्या उगमापासून ते समुद्राला मिळेपर्यंतचा प्रवास, या प्रवासातील टप्पे, नदीचे आपण बदलवलेले स्वरुप, जलप्रदूषणाची समस्या, नद्यांचा होणारा -हास, माणसाच्या आयुष्यामध्ये पाणी हे अतिशय महत्वाचे असून ते वाचविणे आज काळाची गरज बनली आहे. म्हणूनच जल व्यवस्थापनाचे महत्व लक्षात घेऊन या सर्व गोष्टींची विद्यार्थ्यांना व पालकांना संवेदनशीलतेने जाणीव करुन देणारे श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या इ.पहिली व दुसरीच्या गटाचे शनिवार, दि. २२ फेब्रु. आणि इ. तिसरी ते सहावीच्या गटाचे रविवार, दि. २३ फेब्रु. रोजी मोठ्या जल्लोषात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. म्हणूनच जल व्यवस्थापनाचे महत्व लक्षात घेऊन या सर्व गोष्टींची विद्यार्थ्यांना संवेदनशीलतेने जाणीव करुन देण्यासाठी गेल्या वर्षभरात शाळेमध्ये नदी या विषयाशी संबंधित सर्व उपक्रम राबविण्यात आले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी याच वार्षिक उपक्रमांचा समावेश करत पालकांसमोर वार्षिक अहवाल सादर केला.
या वर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘नदी – एक जीवनवाहिनी’ या विषयाच्या अनुषंगाने संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदारपणे नृत्य सादर केले. आपल्या नृत्यातून त्यांनी पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहनच जणू समोर बसलेल्या पालक श्रोत्यांना केले. नदीच्या प्रवासातील विविध टप्पे आपल्या नृत्याच्या माध्यमातून या बाल कलाकारांनी सादर करत जवळजवळ तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवले. ‘नदी – एक जीवनवाहिनी’ म्हणून तिची स्वच्छता करणे व तिचे अस्तित्व टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारीच नव्हे तर आद्य कर्तव्य आहे, हा संदेश चिमुकल्यांनी या स्नेहसंमेलनातून दिला. पालक बंधू-भगिनींच्या मनात देखील या विषयाबाबत जनजागृती निर्माण झाली व पालक बंधू-भगिनींनी देखील अशा पर्यावरणपूरक विषयांनी स्नेहसंमेलन संपन्न होते याचे विशेष कौतुक केले.
या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रम प्रसंगी देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, पि.-चिं. महानगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, लोहगाव गटाच्या केंद्र प्रमुख सौ. शांता इचके, सनदी लेखापाल किशोर जाधव, देहूचे माजी सरपंच अशोकराव मोरे, माजी सरपंच कृष्णा परंडवाल, गोडुंब्रे गावचे वि.वि.का.सह.सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय सावंत, दिशा सोशल फाउंडेशनचे सदस्य सचिन साठे, उद्योजक शंकर काळभोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक सचिन ढोबळे आदी मान्यवर व सृजन फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक, सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. दोन्ही दिवस उत्स्फूर्त प्रतिसाद देत बहुसंख्येने पालक उपस्थित होते. वर्षभरातील उत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी व शंभर टक्के उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
स्नेहसंमेलन हा बालचमूंच्या कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम आहे, म्हणूनच या कार्यक्रमाचे शिवधनुष्य या बाल कलाकारांनी अगदी लीलया पेलत सूत्रसंचालनापासून ते आभारप्रदर्शनापर्यंत सगळी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. इ. तिसरी व चौथी च्या मुलांनी नाट्यकरणातून ‘नदी- एक जीवनवाहिनी’ ही संकल्पना आपल्या अभिनयाने सादर केली. या नाट्यकरणात आजोबा – यशराज मंत्री (४थी ब), आजी – आराधना प्रसाद (४ थी अ), आई – आरोही जाधव (४ थी क), काका – दिपक घारे (४ थी क), रिया – गौरवी चव्हाण (३ री ई), राज – रितुषा देवरे (३ री ई), नदी – ईश्वरी समरीत (४ थी अ) या बाल कलाकारांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय देत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच ओवी काळोखे (४ थी ब) व ऐश्वर्य पाटील (४ थी ड) यांनी आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने श्रोत्यांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सृजन फाउंडेशनचे सचिव प्रा विकास कंद यांनी केले. तर, ईश्वरी समरीत (४ थी अ) हिने आभार प्रदर्शन केले.