- देहूनगर पंचायत प्रशासनाचा पाणीपट्टी थकबाकीदारांना इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २७ फेब्रुवारी २०२५) :- देहूनगर पंचायत प्रशासनाने धडक कारवाई करीत २० पाणीपट्टी थकबाकीदारांचे नळजोड तोडले असून १५ जणांकडून सात लाख रुपयांची वसुली केली आहे. नगर पंचायतीचे पाणी विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी ही माहिती दिली.
देहू नगर पंचायत हद्दीत ३ हजार ८७६ अधिकृत नळजोडधारक असून अनेक अवैध नळजोड आहेत. नळजोड धारकांकडे ३ कोटी ६० लाख रुपये पाणी आकार थकबाकीतील फक्त ६० लाख रुपयांची वसुली झाली आहे. शासनाच्या आदेशान्वये थकीत कर वसुली मोहिमेअंतर्गत मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये १५ थकबाकीदारांकडून सुमारे ७ लाख रुपये वसूल करण्यात आले. तर चैतन्य पार्क व निसर्ग सोसायटीत कारवाई करीत २० जणांचे नळजोड तोडण्यात आले. नगर परिषदेकडून प्रतिदिन ही कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईद्वारे अवैध नळजोड तपासणी आणि मालमत्ता व पाणी आकार थकबाकीदारांकडून कर वसुली करण्यात येणार आहे. तसेच एक मार्चपासून थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.


















