न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरवदिन नुकताच साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्थापन केलेल्या समितीकडे पालिकेने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे महापालिकेचे मराठी भाषेप्रती असणारे प्रेम खरोखरच आहे? की केवळ दिखावा आहे, असा सवाल शहरातील मराठीप्रेमी नागरिक करीत आहेत.
साडेपाच वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेली मराठी भाषा संवर्धन समिती ही कागदावरच राहिली आहे. सुरुवातीला मोजक्या दोन बैठका झाल्यानंतर ही समिती जवळपास गुंडाळण्यात आली आहे. या समितीचे कामकाज पूर्ववत सुरू करावे, अशी भूमिका शहरातील साहित्यिक करीत आहेत. परंतु, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
या समितीची पहिली बैठक एप्रिल २०१९ मध्ये झाली होती. त्यानंतरच्या पुढच्या बैठकीत काही मोजक्या बाबींवर चर्चा करण्यात आली. दोन बैठकीनंतर ही समिती केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यानंतर कोणतेही ठोस कामकाज या समितीमार्फत करण्यात आलेले नाही. त्यामुळे मराठी भाषा संवर्धन समितीची नव्याने रचना करून त्याद्वारे मराठीच्या हितासाठी कल्याणकारी कार्यक्रम राबवावा, अशी मागणी होत आहे.
मराठी भाषा संवर्धन समितीच्या सुरुवातीला दोन ते तीन बैठका झाल्या. त्यानंतर मात्र, समितीचे कामकाज थांबले. ही समिती पुनरुज्जीवित होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
– राजन लाखे, शाखा अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी-चिंचवड…











