- पुणे जिल्ह्यातील कारवाईचे स्वागत; संपूर्ण महाराष्ट्रात मोहीम राबविण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ११ सप्टेंबर २०२६) :- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्यासाठी अश्लील व विभत्स डीजे डान्सप्रकारांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या टीना शर्मा घेवारे यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारांविरोधात प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचे स्वागत करत, ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याची मागणी त्यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी, पुणे पोलीस आयुक्त, गृह विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन कारवाईची मागणी करण्यात आल्याचे घेवारे यांनी सांगितले. या पाठपुराव्यात चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राची ओळख संत, महापुरुष आणि समाजसुधारकांच्या समृद्ध परंपरेमुळे आहे. सार्वजनिक कार्यक्रमांच्या नावाखाली अश्लील व विभत्स प्रकार वाढू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यात सुरू झालेली कारवाई इतर जिल्ह्यांतही राबवावी, अशी मागणी करताना कार्यक्रमांना परवानगी देताना नियमांचे काटेकोर पालन करावे. आयोजक व संबंधित कलाकारांवरही जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“पुणे असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, अश्लील डीजे डान्सप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी,” असे टीना शर्मा घेवारे यांनी म्हटले.


















