न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२५) :- महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे.
राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मध्यावधी (Mid Term) आढावा २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वरिष्ठ राज्य व क्षेत्रीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सर्वोत्तम कामगिरीमुळे आयुक्त शेखर सिंह यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महानगरपालिका संचालनालयाने राज्यातील २२ महापालिकांपैकी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सहा महापालिकांची यासाठी निवड केली होती. त्यामध्ये अंतिम मूल्यमापनामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला असून ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ई-प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट, नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणि आधुनिक सार्वजनिक तक्रार निवारण प्रणाली यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्याने महापालिकेला हे यश प्राप्त झाले आहे.











