न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२५) :- आगामी महानगरपालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील महिलांनी सक्रीय होऊन आरक्षणाचा फायदा घ्यावा. महिलांचे संघटन उभे करावे. महिला, युवक व युवती, विद्यार्थी व सर्व सेलने जोमाने काम करावे. निवडणूकीस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा. महिला दिनानिमित्त प्रभागांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करा. घरोघरी राष्ट्रवादी विचार व विस्तार हा उपक्रम राबवावा, अशा सुचना शहराध्यक्ष योगेश बहल यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केल्या. शहराची नुतन कार्यकारिणी अजितदादांच्या मार्गदर्शनात लवकच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. अण्णा बनसोडे निरिक्षक सुरेश पालवे, महिला निरिक्षक शितल हगवणे यांची प्रमुख उपस्थित होती.
दरम्यान बैठकीत पक्षाची नुतन कार्यकारिणी जाहिर करणे, सदस्य नोंदणी अभियान शुभारंभ, आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने एकहाती सत्ता आणण्यासाठी पक्ष संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली.
आ. अण्णा बनसोडे यांनी चिंचवड, पिंपरी, भोसरी या तिन्ही मतदार संघात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी योगेश बहल यांनी चांगले काम केले आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाला व संघटनेला ताकद देणार असल्याचे सांगितले.















