- इकडे विभागं मात्र, पडलीत ओस…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सन २०३२ मध्ये ५० व्या वर्धापन दिनाकडे वाटचाल करत आहे. या निमित्त शहराचे Vision@50 धोरण विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये शहराच्या राहणीमानात सुधारणा करुन जागतिक शाश्वतता निर्देशांक गाठण्यावर भर दिला जाणार आहे. या कामकाजासंदर्भात City Transformation Office मार्फत आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या संदर्भात सर्व विभागप्रमुखांसाठी शुक्रवार ते रविवार या कालावधीमध्ये निवासी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशासकीय राजवटीत पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार अतिशय संथ गतीने सुरु आहे. महापालिकेची मुदत संपल्यामुळे नगरसेवक आणि पदाधिकारी नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचा वारू चौफेर उधळताना दिसत आहे. भरगच्च अभ्यास दौरे, विविध शहरांच्या भेटी यात अधिकारी अगदी रमून गेले आहेत.
दरम्यान Developing Vision@ 50 and Managing city Transformation च्या कामकाजाकरिता दि. २८/०२/२०२५ ते दि. २/०३/२०२५ या कालावधीत गरुडमाची, ताम्हीनी घाट रोड येथे अधिकाऱ्यांसाठी निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. महापालिकेचे जवळपास पन्नास अधिकारी त्या कार्यशाळेत उपस्थित राहण्यास गेले आहेत. सर्वच महत्वाच्या विभागातील अधिकारी तिकडे गेल्याने महापालिकेचे कामकाज ठप्प पडले होते. शुक्रवारी सर्वच विभागात शुकशुकाट होता. शहरातील नागरिक नेहमीप्रमाणे आपली कामे घेऊन महापालिकेत आली होती. परंतु, अधिकारी दालनात दिसत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. सोमवारी पालिकेचे कामकाज पूर्वरत सुरु राहणार आहे.














