न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. 04 मार्च 2025) :- बीडमधील मस्सोजगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण चांगलचं तापलं असून या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन धनंजय मुंडेंना तातडीने राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार मुंडे यांनी आज राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
तो राज्यापालांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहेत. त्यांच्याकडे राजीनाम्याचं पत्रही आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. पीए राजीनाम्याचं पत्र घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर वारंवार आरोप होत होते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील सातत्याने केली जात होती. फडणवीस आणि अजित पवारांनी त्यांना लाथ मारून बाहेर काढावं अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती.
या हत्याप्रकरणाचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर रात्री मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरीवर महत्वाची बैठक झाली. त्यामध्ये शेवटी राजीनामा द्यावाच लागेल, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा असा आदेश दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं होत. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिल्याचे समजते आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. याआधी सुद्धा याच मुद्यावरुन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी करण्यात आली होती. पण सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नव्हता. हे फोटो समोर आल्यानंतर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल होता.
काय म्हणाले मुख्यमंत्री?…
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. तो मी स्वीकारलेला आहे. तो राजीनामा पुढील कारवाईसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत होते.