- सुदुंबरे, सूदवडी, जांबवडे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे (दि. ०४ मार्च २०२५) :- मावळ तालुक्यातील सुदुंबरे, सूदवडी, जांबवडे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला आहे. दरम्यान मंगळवारी (दि. ०४) रोजी शेतात काम करणारे शेतकरी आणि शेतमजूर यांना शेतात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले आहेत.
दरम्यान या बिबट्याने परिसरातील एका कुत्र्याची शिकार केल्याचे देखील स्थानिकांनी ‘न्यूज पीसीएमसी’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे शेतकरी आणि शेतात काम करणारा मजूर वर्ग धास्तावला आहे.
सध्या उसतोडणी जोरात सुरु आहे. त्यामुळे बिबट्याचा अधिवास अडचणीत आला आहे. त्यामुळे वाट मिळेल तिकडे हा प्राणी निवाऱ्याच्या शोधार्थ भटकत आहे. वरील परिसरात नागरीकरण कमी आणि शेतीचा मोठा भाग असल्यामुळे बिबट्याच्या हे पथ्यावर पडत आहे. पाळीव प्राणी आणि मनुष्यावरील हल्ले टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
भंडारा डोंगराच्या पायथ्याला श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळा येत्या शनिवारपासून सुरु होणार आहे. सप्ताहभर चालणाऱ्या या सोहळ्यास सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भक्त-भाविक मोठ्या संख्येने इथे येणार आहे. बिबट्याचा वावर असणारी वरील गावं येथून हाकेच्या अंतरावर आहेत. इथे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात वावर असेल. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वन विभागाने वेळीच हालचाली करून बिबट्याला जेरबंद करणे गरजेचे आहे.












