न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडअंतर्गत शहरातील उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळ (पे अॅण्ड पार्क) करण्याचा प्रशासनाने घाट घातला आहे. त्याची सुरुवात सोमवारी (दि. ३) करण्यात आली. दुचाकीसाठी एका तासाला ५ रुपये तर चारचाकीसाठी १० रुपये, रिक्षासाठी ५ रुपये, मिनी टेम्पोसाठी १५ रुपये, मिनी बससाठी २५ रुपये आणि ट्रक व बससाठी १०० रुपये दर शुल्क आहे. हे काम निविदा न काढता थेट पद्धतीने ओलोई मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीला देण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील कासारवाडी येथील भारतरत्न जे. आर. टी. टाटा उड्डाणपूल, चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपूल आणि निगडीतील मधुकर पवळे पुलाखाली सशुल्क वाहनतळ सुरू केले आहे.
दुसऱ्या टप्प्यात थेरगाव येथील डांगे चौक, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी येथील साईचौक, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चापेकर चौक, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प उड्डाणपूल येथे पे अॅण्ड पार्क सुरू करण्यात येणार आहे.
शहरातील तीन ठिकाणी सोमवार (दि.३) पासून ‘पे अॅण्ड पार्क’ योजना सुरू केली आहे. दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
– अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता – शहरी दळणवळण विभाग…










