न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२५) :- देहूगावमधील मुख्य कमान ते चौदा टाळकरी कमानीदरम्यान नो पार्किंगमध्ये रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या दुचाकी वाहनांवर तळवडे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरातील काही ठिकाणी पी १, पी २ असे मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. येथील महाराष्ट्र बँकेत जाणारे नागरिक नो पार्किंगमध्ये वाहने लावून जातात. अशा वाहनांवर तळवडे वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करत चालकांकडून दोन हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुख्य मंदिर ते १४ टाळकरी कमान दरम्यानदेखील दुचाकी, चारचाकी वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. परंतु, संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी अनेक वारकरी, भाविक दुचाकीवरून येत असतात. अशावेळी वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन येते आणि भाविकांनी लावलेल्या दुचाकी उचलून घेऊन जातात. त्यांना वाहन सोडवण्यासाठी तळवडे येथील वाहतूक पोलिस चौकीत जावे लागते. त्यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.










