न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात सहभागी होत सर्व विभागांच्या कार्यालयांमध्ये सुशोभिकरण केले जात आहे. तसेच अंध नागरिकांसाठी ब्रेल लिपीतून सूचनाफलकही लावण्यात आले आहे.
कृती आराखडा उपक्रमानुसार सर्व विभागांच्या कार्यालयात बदल करण्यात येत आहेत. सर्व कार्यालये, शाळा, गोदाम, रुग्णालये व दवाखाने, विभागीय कार्यालये व इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून महापालिकेच्या वतीने साफसफाई करण्यात आली आहे. अनावश्यक फाईल्स व कागदपत्रांची रद्दी केली जात आहे. आवश्यक फाईल्सचे गड्ढे तयार करून अभिलेख विभागाकडे ते जमा केले जात आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आवारात बाके ठेवली जात आहेत.
महापालिका भवनात जागोजागी शोभिवंत झाडांच्या कुंड्या ठेवून सजावट करण्यात आली आहे. तसेच जिन्यात महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली सुंदर चित्रे फ्रेम करूनलावण्यात आली आहेत. आवश्यक ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. अंध नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये म्हणून लिफ्टजवळ मराठीसह ब्रेल लिपीत सूचनाफलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे अंध नागरिकांनी गैरसोय दूर झाली आहे.
ब्रेललिपीमध्ये सूचना फलक लावल्यामुले महापालिकेत येणाऱ्या अंध व्यक्तींची सोय झाली आहे. त्यांना सूचना वाचता येणार आहे. दरम्यान शंभर दिवसांच्या कृती आरखड्यानुसार योग्य नियोजन करण्यात येत आहे. सर्व विभागाचे सुशोभिकरण केले आहे.














