न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२५) :- महापालिकेच्या अभियंत्यांनी शहरातील विविध ठिकाणी दुय्यम दर्जाचे रस्ता दुरुस्तीचे काम केले असल्याचे समोर येत असतानाच त्या दर्जाहीन कामांवर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीओईपी) ने शिक्कामोर्तब केले आहे.
स्थापत्य विभागातील दोषी १७ कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई करण्याची शिफारस शहर अभियंत्यांनी आयुक्तांकडे केली आहे. मात्र, आयुक्तांकडून कारवाईबाबत निर्णय घेतला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दुरुस्ती व देखभाल कामांची निविदाप्रक्रिया स्थापत्य विभागाने सन २०१९-२० मध्ये राबविली. ती सर्व कामे तब्बल ४० टक्केपेक्षा कमी दर खर्चात पूर्ण करण्यात आली. या कामांसंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर कामांत दर्जा राखला नसून, ती कामे दर्जाहीन झाल्याचे तक्रारीत नमूद होते. त्याची दखल घेऊन सिंह यांनी ती सर्व १७ कामे सीओईपी संस्थेकडून तपासून घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सीओईपीच्या प्रतिनिधींनी २७ जून ते १२ जुलै २०२३ या कालावधीत प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली. त्याचा अहवाल १९ ऑक्टोबर २०२३ ला महापालिकेच्या दक्षता व गुणनियंत्रण कक्षाकडे सादर केला. त्या कामांचा खर्च संबंधित ठेकेदारांकडून वसूल करण्याचे सांगण्यात आले होते. आयुक्तांच्या आदेशानुसार ठेकेदारांकडून तो खर्च वसूल करण्यात आला. मात्र, दोषी १७ कनिष्ठ अभियंत्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
दुय्यम दर्जाचे रस्ते दुरुस्ती व इतर कामांच्या प्रकरणातील महापालिकेच्या दोषी कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाईबाबतचा अहवाल आयुक्तांसमोर गेल्या महिन्यात सादर केला आहे. ते त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
अशी आहेत कनिष्ठ अभियंत्यांची नावे…
त्यात वर्षा कदम, अंकुश सईजराव, संदीप खोत, विजय जाधव, अग्गु घेरडे, महेंद्र देवरे, वृषाली पोतदार, अशोक मगर, विकास गोसावी, राजेंद्र इंगळे, संजय खरात, शिवाजी वाडकर, संध्या वाघ, सुनील दांडगे, निखिल फेंडर, राजेंद्र क्षीरसागर, धनंजय गवळी.














